Breaking News

खंडित वीज पुरवठा ; पनवेलकरांची न सुटणारी समस्या

खंडित वीज पुरवठा ; पनवेलकरांची न सुटणारी समस्या

पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये अखंडित वीजपुरवठा हे फार मोठे आव्हान ठरत आहे. विशेष करून साडेतीन वर्ग किलोमीटर मध्ये असणाऱ्या जुने पनवेल क्षेत्रामध्ये तर वारंवार जाणारी वीज ही एक प्रकारची डोकेदुखी ठरत आहे. या क्षेत्रामध्ये सध्या असणारे एक सब स्टेशन पुरेसे नाही. दुसरे सब स्टेशन उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. वितरण नियोजनाचा विचार केल्यास दुसऱ्या स्टेशनची निर्मिती स्वागतार्ह आहेच पण जर निर्धारित विजच मिळणार नसेल तर ही समस्या कशी काय सुटणार? थोडक्यात काय तर अडातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार? असा सवाल पनवेलकर करत आहेत. नवीन घरी शिफ्ट होताना एल पी जी गॅस, टी व्ही,फ्रिज या गरजेच्या वस्तू असतात. परंतु पनवेल परिसरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा पाहिल्यानंतर घरामध्ये बॅटरीवर चालणारा इन्व्हर्टर बसवणे हे सुद्धा प्राथमिकता बनू लागली आहे.विजेचा दाब देखील सातत्याने वर खाली होत असतो. याचा फटका महागड्या विद्युत उपकरणांना देखील बसतो आहे. परंतु निम्न मध्यमवर्गीय किंवा दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना इन्व्हर्टर सारखी चैनीची वस्तू कशी काय परवडणार? तरी देखील पोटाला चिमटा घेत ईएमआय चा बोजा सहन करत अगदी गरिबांच्या घरात देखील हे इन्व्हर्टर दिसू लागले आहेत. मागणी तसा पुरवठा हा मार्केटचा नियम आहे हे मान्य, म्हणूनच जेवढी मागणी आहे तेवढा विजेचा पुरवठा झाला तर हे सगळेच प्रश्न निकालात निघतील. विद्युत प्रवाह खंडित झाल्यानंतर महावितरण महापारेषण सारख्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवरती आग पाखड होण्यास सुरुवात होते. कुशल मनुष्यबळ असलं तरीदेखील ग्लोव्हज, उंच शिड्या, विविध आकारमानाच्या पकडी असे साहित्य दिले नाही तर विद्युत पुरवठा सुरळीत करू पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक प्रकारची मर्यादा येते. आज वस्तुस्थिती ही आहे की हे सारे कर्मचारी अक्षरशः जीवावर उदार होऊन लाईन्सच्या दुरुस्ती देखभालीचे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे काम करत आहेत.आठवड्यातील एक दिवस देखभाल दुरुस्ती साठी 6 ते 7 तासांचा पॉवर कट घेऊन देखील बाकीच्या दिवसात अखंडित वीजपुरवठा देणे शक्य होत नाही.याचे कारण वितरण व्यवस्थेवरील ताण असू शकते.वितरण व्यवस्थेवर असलेला ताण नजीकच्या भविष्यात कमी होईल.दुसरे सब स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर विजेचे वितरण करण्यात बऱ्यापैकी सुसूत्रता आणता येईल.परंतु या विभागाचा झपाट्याने विकास होत आहे. वडोदरा मुंबई महामार्ग, अलिबाग विरार बहुउद्देशीय मार्गिका, कर्जत पनवेल उपनगरीय रेल्वे सेवा अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. भव्य दिव्य गृहनिर्माण संकुले आकार घेत आहेत. पर्यायाने या ठिकाणी विजेची मागणी वाढणार आहे. तूर्तास अपेक्षित वीज मिळत नाही, महावितरण कर्मचाऱ्यांकडे अद्ययावत उपकरणे नाहीत, विजेचे वितरण करताना अनेक मर्यादा येत आहेत पर्यायाने अखंडित वीज पुरवठा हे पनवेलकरांसाठी एक स्वप्नवत परिस्थिती बनली आहे. या साऱ्यावर उपाय म्हणजे आगामी 25 वर्षात वाढणारी लोकसंख्या ध्यानात घेऊन विजेचा तुटवडा भरून काढणे. आज खरे तर जी परिस्थिती पनवेल मध्ये आहे तशीच ती महाराष्ट्रातल्या बहुतांश तालुका ठिकाणी आहे. पनवेल हे महाराष्ट्रातील वीज खंडित होणाऱ्या तालुक्यांचे प्रतिनिधी स्वरूप मानले तर ते अजिबात वावगे ठरणार नाही. आज संपूर्ण महाराष्ट्राला 2000 मेगावॅट विजेचा तुटवडा भासत आहे.मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प अंतर्गत हा विजेचा तुटवडा भरून काढण्यासाठी पंतप्रधान कार्यालय थेट अंकुश ठेवून आहे. या प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्राला हरित ऊर्जा मिळणारा असून ही ऊर्जा पनवेलवासीयांची समस्या सोडविण्यात सिंहाचा वाटा उचलणार आहे. अतिरिक्त वीजपुरवठा होण्यापूर्वी त्या विजेचे वितरण करण्यासाठी लागणारे सब स्टेशन आणि भूमिगत वाहिन्या ही कामे करणे देखील तितकेच आवश्यक आहे. मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पामुळे इन्व्हर्टर मुक्त पनवेल होण्याची गोंडस लक्षणे मात्र दिसू लागली आहेत. त्यामुळे एकदा का आड भरले तर पोहोऱ्यात सहज येतच.


Most Popular News of this Week