मनपा कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मनसे आक्रमक, आयुक्तांना सात दिवसांचा अल्टीमेटम , मागण्या मान्य न झाल्यास शंखनाद मोर्च्याचा मनसे इशारा
मनपा कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मनसे आक्रमक, आयुक्तांना सात दिवसांचा अल्टीमेटम , मागण्या मान्य न झाल्यास शंखनाद मोर्च्याचा मनसे इशारा
नवी मंबई :- महापालिके अंतर्गत काम करणाऱ्या १७ विभागांतील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी मोठ्या संख्येने कामगार बांधव उपस्थित होते.गेली कित्येक वर्षे मनसे मनपा कामगार कर्मचारी सेना कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा व आंदोलने करत असल्याचे नवी मुंबई अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कोविड काळात कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या ‘क’ व ‘ड’ वर्ग कंत्राटी कामगारांना ५० लाखाचे विमा कवच देण्याचा निर्णय दिनांक २८ जुलै रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत झाला होता. मात्र अजूनही हे पैसे मृत कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियांना मिळालेले नाहीत.याबाबत मनपा प्रशासनाने राज्य शासनास त्वरित प्रस्ताव पाठवावा.मनसेच्या मागणीप्रमाणे "समान काम समान वेतन" द्या अशी मागणी प्रथम दिनांक ९ एप्रिल २०२१ रोजी करण्यात आली होती.तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने दिनांक २५ जुलै २०२२ रोजी प्रधान सचिवांना पाठवला, परंतु प्रस्ताव पाठवताना त्यामध्ये कामगारांची वर्गवारी मनपा प्रशासनाने चुकीची टाकली. पंप चालक, पंप ऑपरेटर, मीटर रीडर, व्हॉल ऑपरेटर, पीएलसी ऑपरेटर, फिटर, क्लोरिन केमिस्ट ऑपरेटर हि पदे का. आ. १८६ (अ) भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या अधिसूचना सं. का. आ. २८३२ (अ) दिनांक १ सप्टेंबर २०१६ रोजीच्या राजपत्रानुसार कुशल वर्गवारी मध्ये आहेत. मात्र मनपा प्रशासनाने "समान काम समान वेतन" प्रस्ताव पाठवताना वरील सर्व पदे अकुशल व अर्धकुशल वर्गवारी मध्ये नोंद केली आहे. त्यामुळे सर्व पदे ही कुशल वर्गवारी मध्ये टाकावीत आणि सुधारित प्रस्ताव लेखी स्वरुपात त्वरित पाठवण्यात यावा.नवी मुंबई महापालिकेमध्ये सर्व विभागांमध्ये अंदाजे ६५०० कंत्राटी कामगार काम करत आहेत. या सर्व कामगारांना वार्षिक रजा असाव्यात अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. मागणीनुसार महापालिकेच्या इतिहासात प्रथमच वार्षिक ८ रजा मंजूर करण्यात आल्या. सदर रजा या दिनदर्शिका वर्षात ८ वेळा मिळणार आहेत. याबाबत अंमलबजावणी करताना कुठलेही नियम अटी, शर्ती ठरवण्यात आल्या नाहीत. या रजेबाबत प्रशासन विभागाने नियम अटी शर्ती ठरवाव्यात. किंवा या ८ रजेचे दिवस ठरवून तशी सविस्तर यादी जाहीर करावी.किमान वेतन लागू करताना कंत्राटी कामगारांना चुकीच्या वर्गावारीमध्ये टाकण्यात आले होते. याबद्दल मनसे गेली अनेक महिने पाठपुरावा करत आहे. वर्गवारीचा विभागनिहाय प्रस्ताव प्रशासन विभागास पाठवला आहे. त्याची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून करण्यात यावी.उद्योग ऊर्जा कामगारांच्या परिपत्रका नुसार ७०७० रुपये महागाई भत्ता लागू करून फरका सकट अदा करावा.एन के शाह या कंत्राटदाराने कामगारांना दिवाळी बोनस दिला नाही आहे. तो त्वरीत देण्याची अंमलबजावणी करण्यात यावी.सर्व रुग्णालयातील कामगारांना दोन हजार रुपये वेतन कमी देण्यात येते. तो फरक व महागाई भत्ता ७०७०/- रुपये नुसार महागाई भत्याप्रमाणे पगार देण्यात यावा आणि मागील संपूर्ण फरक अदा करण्यात यावा.नवी मुंबई महानगरपालिकेमधील उद्यान विभाग व घनकचरा विभागातील सफाई कामगारांना पगार कमी दिला जातो तो महागाई भत्यातील फरका सकट देण्यात यावा.नवी मुंबईतील सर्व कंत्राटी कामगारांना ग्रॅज्यूएटी लागू करावी.नवी मुंबई सर्व कंत्राटी कामगारांना ओळखपत्र देण्यात यावे. व या ओळखपत्रावर महापलिकेचा सिम्बॉल आणि नाव असावे.घनकचरा विभागातील कचरा वाहतूक चालक हे कुशल वर्गवारी मध्ये असताना त्यांना अर्धकुशल वर्गवारीनुसार पगार देण्यात येतो या सर्व कामगारांना कुशल वर्गवारी प्रमाणे पगार देण्यात यावा.सन २०१५ साली किमान वेतन लागू झाल्यामुळे त्याची अंबलबजावणी २०१८ साली करण्यात आली. इतर सर्व विभागातील कामगारांना २७ महिन्याचा पगारातील फरक देण्यात आला परंतु अनेक वर्ष मनसेने पाठपुरावा करून देखील परिवहन विभागातील सफाई कामगारांना किमान वेतन लागू केले परंतु अद्यापही त्यांना २७ महिन्याचा पगारातील फरक देण्यात आला नाही. त्याची अमलबजावणी त्वरित करण्यात यावी.अश्या मागण्या मनसेने आयुक्तांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केल्या आहेत.मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या या मागण्यांना आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित मनपा विभागांशी चर्चा करून मनसेच्या मागण्यांवर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. मनसेच्या या शिष्ट मंडळात नवी मुंबई अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, चिटणीस अशोक पाटील, सहचिटणीस रणजीत सुतार, उपाध्यक्ष देवा भोईर, संदीप सुतार, महेंद्र पाटील, महेंद्र म्हात्रे, विष्णू शेळके, युनियन संघटक नीलकंठ कोळी, सुनील रायबोले व मोठ्या संख्येने कामगार बांधव उपस्थित होते. महापलिका प्रशासनाने सात दिवसांच्या आत मनसेच्या मागण्या मान्य न केल्यास कामगारांसमवेत भव्य "शंखनाद" मोर्चा काढणार असल्याचा इशारा मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष अप्पासाहेब कोठुळे यांनी प्रसिद्धीपत्रकात दिला आहे.