Breaking News

‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ उपक्रमांतर्गत नवी मुंबईत डी मार्टमध्ये रिसायकल मार्टला सुरूवात

‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ उपक्रमांतर्गत नवी मुंबईत डी मार्टमध्ये रिसायकल मार्टला सुरूवात

‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ उपक्रमांतर्गत नवी मुंबईत डी मार्टमध्ये रिसायकल मार्टला सुरूवात


नवी मुंबई :- केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन मार्फत ‘माझे जीवन, माझे स्वच्छ शहर (Meri Life Mera Swachh Shahar)‘ हा अभिनव उपक्रम 15 मे पासून 5 जून पर्यंत राबविण्याचे निर्देशित करण्यात आले असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘21 दिवस चॅलेंज’ अंतर्गत ‘थ्री आर’ ही संकल्पना राबविली जात आहे.घनकचरा व्यवस्थापनात ‘थ्री आर’ ही अत्यंत महत्वाची संकल्पना असून यामध्ये कचरा कमी करणे (Reduce), कच-याचा पुनर्वापर करणे (Reuse) व कच-यावर पुनर्प्रक्रिया करणे (Recycle) अपेक्षित आहे. या विषयास अनुरूप कार्यवाही करीत नवी मुंबई महानगरपालिकेने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम यापूर्वीच राबविले आहेत. यामध्ये ‘जुने असेल त्या द्या आणि हवे असेल ते घ्या’ ही घरातील टाकाऊ वस्तूंची संकलन केंद्रे गरजूंपर्यंत वस्तू पोहचविण्याचे उत्तम माध्यम झाले आहे.

                      मागील 2 वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांकडून तर उत्साही प्रतिसाद मिळतोच आहे, शिवाय राष्ट्रीय पातळीवरही या अभिनव उपक्रमाची दखल घेऊन कौतुक झाले आहे. आता तर अशी थ्री आर सेंटर्स सर्व देशभरात सुरू करण्याचे केंद्र सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेले आहे.सातत्याने नाविन्याचा ध्यास घेतलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरात तब्बल 92 ठिकाणी ‘थ्री आर सेंटर्स’ सुरू असून आता त्यापुढचे पाऊल टाकीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझे जीवन, माझे स्वच्छ शहर (Meri Life Mera Swachh Shahar)‘ या केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अभिनव उपक्रमांतर्गत ‘थ्री आर’च्या अनुषंगाने ‘रिसायकल मार्ट’ ही अभिनव संकल्पना राबविण्यास आजपासून सेक्टर 15, सीबीडी बेलापूर येथील डी मार्ट मध्ये सुरूवात झालेली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या शुभहस्ते सुरू झालेल्या या रिसायकल मार्टच्या विशेष काऊंटरच्या शुभारंभप्रसंगी बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त शशिकांत तांडेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.‘रिसायकल मार्ट’ ही अत्यंत आगळीवेगळी संकल्पना असून ‘थ्री आर’ च्या अनुषंगाने यामध्ये नागरिकांनी घरातील  वापरून झालेले कपडे, प्लास्टिक बॉटल्स, वस्तू व दुधाच्या पिशव्या, लेदरचे साहित्य, भांडी, वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे अशा टाकाऊ वस्तू डी मार्ट मध्ये आणून दिल्यास त्यावर त्यांना वस्तूंनुसार पॉईंट्सची कुपन्स दिली जाणार आहेत. त्या पॉईंट्सनुसार त्यांना तितक्या रक्कमेची सूट त्यांनी डी मार्ट मध्ये खरेदी केलेल्या नव्या सामानावर दिली जाणार आहे. याव्दारे घरातील सुक्या कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्या वस्तू उपलब्ध करून देऊन नागरिकांकडून पर्यावरण रक्षणाला हातभार लावला जाणार आहे शिवाय त्या टाकाऊ वस्तूंच्या बदल्यात नागरिकांना पॉईंट्स स्वरूपात आर्थिक लाभही होणार आहे.सुक्या कच-याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी ‘थ्री आर' ची संकल्पना अत्यंत मोलाची असून त्याकरिता डी मार्ट सारख्या लोकप्रिय वाणिज्य आस्थापनेने नवी मुंबई महानगरपालिकेची ‘रिसायकल मार्ट’ संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेतला त्या पर्यावरणशील दृष्टीकोनाचे कौतुक करीत उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी अशा प्रकारचा बहुउपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम देशात बहुधा पहिल्यांदाच राबविला जात असेल असे सांगितले. यामध्ये पर्यावरण जपणूकीसाठी हातभार आणि पॉईंट्सच्या रूपाने पैशांची बचत अशा दोन्ही बाजूने हा उपक्रम नागरिकांसाठी फायद्याचा असल्याने याचा लाभ नागरिक मोठ्या प्रमाणावर घेतील व या उपक्रमाचा उपयोग स्वच्छ सर्वेक्षणातील मानांकन उंचाविण्यासाठी होईल असा विश्वास व्यक्त केला. 


Most Popular News of this Week