पनवेल येथील निवासस्थानी पारनेर नगरच्या आमदारांचे स्वागत
पनवेल : कोरोना योद्धा म्हणून सर्व परिचित असलेले पारनेर- नगरचे आमदार निलेश लंके यांनी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची नुकतीच पनवेल येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आ लंके सर्वसामान्यांसाठी झोकून देऊन काम करत असल्याबद्दल ठाकूर यांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप सुद्धा मारली. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे दानत्व सर्वपरिचित आहे. गरीब गरजूंना मदतीचा हात देण्याबरोबरच शिक्षणामध्ये त्यांचे योगदान भरीव राहिलेले आहे. शून्यातून विश्व निर्माण करत असताना समाजाच्या हितासाठी काम करीत राहायचं, आपल्या उत्पन्नातील काही भाग त्यासाठी खर्च करायचा हा आदर्श वस्तूपाठ ठाकूर यांनी घालून दिलेला आहे. त्यामुळेच त्यांना लोकनेते असे संबोधले जाते. अगदी त्याचप्रमाणे पारनेर नगरचे आमदार निलेश लंके सर्वसामान्यातून पुढे आलेले नेतृत्व आहे. जनतेसाठी 24 तास 365 दिवस कार्यरत राहणे ही त्यांची दिनचर्या आहे. कोरोना काळामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी काम केले. त्याचबरोबर मोहटा देवी आणि एकविरा माता दर्शनासाठी लाखो भगिनींची यात्रा काढून त्यांनी आपल्यातील लोकप्रतिनिधित्व सिद्ध केले. त्यांच्या कार्याची माहिती सर्वदूर पोहोचली आहे. लोकहितवादी म्हणून ओळख असणाऱ्या आमदार निलेश लंके यांनी नुकतीच पनवेल येथे दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मधील निवासस्थानी आ.लंके यांचे ठाकूर यांनी स्वागत केले. त्याचबरोबर वडीलकीच्या नात्याने पारनेरच्या आमदारांचे कौतुक केले. त्यांच्या खासदारकीच्या अनुभवाचे बोल सुद्धा आ. लंके यांच्या कानावर पडले. तुमचे काम अतिशय उत्तम आहे ,माध्यमातून ते मी पाहतो. तुमच्यासारख्या सर्वसामान्यांसाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या आमदाराची भेट घेण्याची मला इच्छा होती. आपण स्वतः माझ्या भेटीला आल्याने आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी दिली. रयत शिक्षण संस्थेमध्ये सर्वसामान्यांची मुले शिकतात. त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने मॅनेजिंग कौन्सिल सदस्य म्हणून तुम्ही सातत्याने प्रयत्नशील आहात. रयतच्या शाळा आणि महाविद्यालयांच्या इमारतींचा जिर्णोद्धार आपण स्वखर्चातून केला. संस्थेला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. त्याचबरोबर आपले दानशूर व्यक्तिमत्व महती मी अगोदर ऐकली होती. आज प्रत्यक्ष भेटीचा योग आला याचा मनोमन आनंद वाटत असल्याची भावना आमदार निलेश लंके यांनी रामशेठ ठाकूर यांच्याकडे व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सतिश पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, अमित पडवळ उपस्थित होते.